थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन
मित्रांनो,
निष्क्रीय कमाई म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहितच असेल! आपले एखादे असे इन्कम हवे जे कमवण्यासाठी आपल्याला कसलेही श्रम पडु नयेत, आणि ती कमाई मिळवण्यासाठी आपली कसलीही उर्जा खर्च होवु नये, किंवा झालीच तर अगदीच थोडी, म्हणजे किंचितशी उर्जा खर्च व्हावी. मागचे काही लेख लिहुन मी तुम्हाला शेअरमार्केटमधुन पॅसिव्ह इन्कम म्हणजे निष्क्रिय कमाईचा अखंड स्त्रोत कसा उभा करावा, ह्याविषयी काही माहिती दिली.
मित्रांनो,
तुमच्यापैकी बरेच जण शेअर मार्केटमध्ये सक्रिय असतील, तुम्ही अनेकदा नफ्याची ट्रेडींग केली असेल, कित्येक वेळा तीन महिने ते एक वर्ष शेअर्स सांभाळले असतील, विकले असतील, नाही म्हण्टले तरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करण्यासाठी उर्जा आणि वेळ दोन्ही खर्च करावीच लागते, जर मी तुम्हाला एक अशी पद्धत सुचवली, जी वापरण्यासाठी तुम्हाला अजिबात डोकं लावावं लागणार नाही, फक्त एक सिस्टीम बनवावी लागेल आणि तिला फॉलो करावे लागेल, ही सिस्टिम फॉलो केल्यास तुम्हाला काय काय फायदे होतील?
-------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक गुंतवणुकदार आणि ट्रेडरला नेहमीच काही प्रश्ण पडलेले असतात. शेअर्सवर नफा होत असेल, तर प्रॉफिट बुकींग करावी की करु नये? किती शेअर्स विकावेत? किती टक्के नफ्यावर विकावेत? शेअर्स कधी खरेदी करावेत? कोणत्या भावात खरेदी करावेत? दर महिन्याला तुम्ही वीस पंचवीस हजार रुपयांची रक्कम शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी बाजुला काढुन ठेवली असेल, तर त्यापैकी किती रक्कम कधी गुंतवावी? कोणत्या शेअर्समध्ये गुंतवावी? असे अनेक प्रश्ण अनुभवी ट्रेडरच्या, गुंतवणुकदाराच्या सुद्धा डोक्याचे भजे करुन टाकतात, मग तुलनेने नवख्या गुंतवणुकदाराची तर काय कथा? अशा अनेक प्रश्णांना अगदी सहजपणे फाटा देऊन गुंतवणुकीची एक सोपी पद्धत अवलंबता येते,
ज्यामुळे तुम्हाला ‘करु का नको?’ ‘घेऊ का नको’ आणि ‘विकु का नको?’
असे कोणत्याही प्रकारचे अजिबात कंफ्युजन होणार नाही.
ही एक लोकप्रिय पद्धत आहे, अनेक मुरलेले मातब्बर खेळाडु ह्याच पद्धतीचा वापर करतात आणि वार्षिक 15 ते 20 टक्के रिटर्न अगदी सहज कमवतात, तेही अजिबात एनर्जी खर्च न करता!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
गुंतवणुकीची तराजु पद्धत! –
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण समजण्यास सोपे जावे म्हणुन ह्या पद्धतीला सोपे सुटसुटीत नाव देऊया,
तराजु पद्धत!
शेअर मार्केटमध्ये कित्येक पिढ्यांपासुन सक्रिय असलेल्या एका गडगंज, गर्भश्रीमंत मित्राने मला डिटेलमध्ये गुंतवणुकीची ही पद्धत समजावुन सांगितली होती, व दरवर्षी ही पद्धत वापरुन त्याला झालेला नफा, त्याचे प्रॉफिट स्टेटमेंट त्याने माझ्याशी शेअर केले. मी सुद्धा ही पद्धत वापरतो आणि त्यातुन फक्त आणि फक्त नफाच होतो, हे मी देखील अनुभवले आहे. अर्थात तुमच्याकडे असलेले भांडवल जितके जास्त तितका जास्त नफा तुमच्या पोर्टफोलिओवर मिळतो. आता तुम्ही अशी कल्पना करा, आपल्या कोर्समधला एक नवीन सदस्य, मिस्टर रीच, शेअर मार्केटमध्ये आपल्या करीअरची सुरुवात करत आहे. मिस्टर रीच च्या अकाउंटला दोन लाख रुपये आहेत, दोन लाख रुपये भांडवल घेऊन तो आपल्या शेअरमार्केटच्या इनिंगची सुरुवात करु इच्छित आहे, आणि प्रत्येक महिन्याला तो पंचवीस हजार रुपये रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवु शकतो, गुंतवणुकीची तराजु पद्धत त्याला असे सांगते की त्याच्याकडे असलेल्या रकमेचे त्याने दोन समान भाग करावेत.
म्हणजे, ती रक्कम दोन भागात विभागुन घ्यावी.
एक लाख + एक लाख = दोन लाख रुपये!
आता जराही वेळ न घालवता, आणि फारसे डोके न लावता, फार जास्त विचार न करता, त्याच्या रकमेचा एक भाग त्याने मार्केटमध्ये चालु आहेत त्या भावात गुंतवुन टाकावा. असं समजा, इतर कुठलीही स्क्रिप्ट घेण्यापेक्षा निफ्टीबिझ घ्या, असा माझा आग्रह मिस्टर रीचला पटलेला आहे. मग त्याने आज बाराशे साठ रु भावाने एक लाख रुपयांचे निफ्टी बिज खरेदी केले. आज एप्रिल महिन्याची तेरा तारीख आहे, आता मिस्टर रीच हा महिना संपेपर्यंत म्हणजे अजुन पुढचे अठरा दिवस शांत बसुन राहील, तो आपल्या कामाला वेळ देईल, तो आपल्या जगण्याचा आनंद घेईल. अगदी त्याने निफ्टीबिझचा भाव नाही पाहिला तरी चालेल. शेअर्सचे भाव वाढले का पडले ह्याचे मिस्टर रीचला काहीही देणेघेणे नाही, बदल हा शेअरमार्केटचा गुणधर्म आहे, अजुन अठरा दिवसांनी म्हणजे एक मे ला एक तर निफ्टीबिझचे भाव वाढलेले असतील, किंवा भाव पडलेले असतील, भाव तिथल्या तिथे घुटमळण्याची शक्यता फार विरळ आहे. तर एक मे तारखेला मिस्टर रीच आपला पोर्टफोलिओ उघडुन पाहील, समजा, त्याने घेतलेल्या शेअर्सची किंमत घटुन ऐंशी हजार एवढी झाली आहे, आता पोर्टफोलिओची किंमत = ८०००० आणि त्याच्याकडे असलेली कॅश मात्र एक लाख रुपये इतकी आहे, आता मिस्टर रीचला फारसे डोके न लावता, दोन्ही पारडे पुन्हा एकदा समान करायचे आहेत, म्हणजे आता तो दहा हजार रुपयांचे निफ्टीबिझ खरेदी करेल, त्यामुळे त्याच्याकडे असलेली कॅश होईल, नव्वद हजार! आणि त्याच्या पोर्टफोलिओची किंमत पण होईल नव्वद हजार!
--------------------------------------------------------------------------------------------
मिस्टर रीच प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हीच कृती करेल, बाकी महिनाभर तो शेअर मार्केटकडे ढुंकुनही बघणार नाही, भाव वाढले किंवा भाव पडले तरी तो टेंशन घेणार नाही, आणि इतर कुठला ट्रेड सुद्धा तो इनिशिएट करणार नाही. मिस्टर रीच ला फक्त त्याच्याकडे असलेली कॅश आणि त्याच्या पोर्टफोलिओची किंमत दोन्ही, समसमान, दोन्ही एकमेकांच्या बरोबर ठेवायच्या आहेत. कॅश आणि इक्विटी ही तराजुची दोन्ही पारडी त्याला मेंटेन ठेवायची आहेत, समजले का? ह्याने काय होईल? जेव्हा जेव्हा निफ्टीबिझ घटुन त्याची किमंत खाली खाली जाईल, तितक्या वेळा मिस्टर रीच आपोआप खरेदी करेल. जेव्हा केव्हा निफ्टीबिझची किंमत वाढेल, तेव्हा मिस्टर रीच आपोआप प्रॉफिट बुकींग करेल. समजा, अजुन तीन महिन्यांनी निफ्टी बिज उसळला, आणि मिस्टर रीच च्या पोर्टफोलीओची किंमत एक लाख चाळीस हजार झाली, मिस्टर रिच च्या अकाउंटला कॅश मात्र साठ हजार इतकीच राहीली आहे, आता दोन्ही पारडे पुन्हा समसमान करायचे आहेत, म्हणुन मिस्टर रीच चाळीस हजार रुपयांचे शेअर्स विकेल, आणि पुन्हा एकदा एक लाख इक्विटी, एक लाख कॅश असे आपल्या संपत्तीचे समान वाटप करेल. मार्केट खाली खाली कोसळत असताना, जास्तीत जास्त खरेदी होईल, मार्केट तेजीत आले की आपोआपच प्रॉफिट बुकींग होईल, तेही फार जास्त डोके न लावता! तुम्हाला फक्त तराजु बॅलन्स ठेवायचा आहे. ह्या पद्धतीचा सर्वात मोठ्ठा फायदा म्हणजे तुम्ही फक्त पन्नास टक्के रक्कम मार्केटमध्ये गुंतवता, म्हणजे भाव पडल्यावर अजुन शेअर्स खरेदी करण्यासाठी तुमच्या अकाउंटला सतत पैसे शिल्लक असतात. नाहीतर बर्याचदा ट्रेडर गुंतवणुकदार वरच्या भावात शेअर्स घेऊन अडकुन बसतो, आणि त्याला हवा तो भाव न मिळाल्यामुळे त्याला एग्झिट करता येत नाही. दर महिन्याला दहा वीस हजारांची एस आय पी करणार्यांसाठी तर ही पद्धत एक वरदान आहे. म्युचल फंड वाले तुम्हाला कंपाउंडींगचे फायदे सांगुन चढ्या भावाने युनिट विकतात, मात्र ह्या पद्धतीत, तुम्ही अगदी योग्य भावात, योग्य प्रमाणात गुंतवणुक करता.
उदा. मिस्टर रिच च्या पोर्टफोलिओची किंमत दिड लाख झाली आहे, आणि त्याच्याकडे दिड लाख रुपयांची कॅशही पडुन आहे. मिस्टर रीच जानेवारी महिन्यात नवी वीस हजारांची गुंतवणुक करु इच्छितो, त्याने पुन्हा एकदा दोन्ही पारडी समसमान करायची आहेत, दहा हजार रुपये मार्केटमध्ये गुंतवायचे, आणि दहा हजार रुपये कॅश वाढवायची, ह्या पद्धतीने निफ्टीबिझमध्ये वार्षिक कमीत कमी पंधरा टक्के रिटर्न मिळालेच पाहिजे. ते ही फारसे डोके न लावता, फारसा रिसर्च न करता, फक्त एक सिस्टीम बनवायची आणि तिला फॉलो करायचे, इतके सोपे आहे हे! करुन पहा, आणि मगच विश्वास ठेवा. ही पद्धत तुम्हाला समजली का? पटली का?
आभार आणि शुभेच्छा!
Comments
Post a Comment