वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना ८०/२०चा नियम हा हरप्रकारे उपयुक्त ठरतो. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पारेतो
याने १८९५मध्ये सर्वप्रथम ही ८०/२०ची संकल्पना मांडली, त्यामुळे हा ‘पारेतोचा नियम’ म्हणूनही ओळखला जातो. पारेतो याच्या असं लक्षात आलं की, या समाजातील लोक अभिजन
आणि बहुजन
अशा दोन गटांत विभागलेले आहेत. यांपैकी ‘अभिजन’ हे मोजके २० टक्के असून, त्यांच्याकडे सर्वाधिक सत्ता, पैसा, संपत्ती एकवटलेली आहे; तर ‘बहुजन’ हे मुबलक ८० टक्के असून, ते तळागाळातील जीवन जगत आहेत.
कालांतरानं त्याच्या असंही लक्षात आलं की, अर्थशास्त्रातील जवळपास सर्व घटकांना हेच सूत्र लागू पडतं. उदाहरणार्थ, हे सूत्र असं सांगतं की, तुमच्या २० टक्के कामगिरीचा प्रभाव हा ८० टक्के परिणामावर पडतो किंवा तुमचे २० टक्के ग्राहक मिळून तुमची ८० टक्के विक्री साध्य करतात, तुमची २० टक्के उत्पादनं किंवा सेवा या तुम्हाला ८० टक्के नफा मिळवून देत असतात; तुमच्या २० टक्के कामगिरीवरून तुमचं ८० टक्के मूल्य ठरत असतं इत्यादी… याचा अर्थ, जर तुमच्यापाशी दहा कामांची यादी असेल, तर त्यापैकी दोन कामं एवढी महत्त्वाची असतात की, बाकीची आठ कामं त्यापुढे फिकी ठरतात.
कामांची संख्या विरुद्ध त्यांचं महत्त्व
तुम्हाला एका रंजक शोधाविषयी सांगतो. दहा कामं आहेत आणि ते प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळही एकसमान आहे, तरीदेखील एक किंवा दोन कामंच पाच-दहा कामांच्या तोडीची किंबहुना अधिक मोलाची ठरतात.
अनेकदा, बाकीची नऊ कामं एका पारड्यात ठेवली, तर त्या तुलनेत दुसऱ्या पारड्यातलं एकच काम भारी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. हे काम म्हणजेच असं कठीण काम जे सर्वांत प्रथम हातावेगळं करायचं आहे! याचाच अर्थ ‘तो बेडूक’ ज्याचा तुम्हाला फडशा पाडायचा आहे!
कोणत्या कामाच्या वेळी मनुष्य जास्तीत जास्त चालढकल करतो हे तुम्हाला माहितीये? खेदाची बाब ही आहे, की बहुसंख्य लोक सर्वाधिक महत्त्वाची १०/२० टक्के ‘अभिजन’ म्हणजेच अतिमहत्त्वाची कामं करतानाच दिरंगाई दाखवतात आणि कमी महत्त्वाच्या ८० टक्के ‘बहुजन’ कामांमध्येच ते स्वतःचा वेळ तसंच शक्ती जास्त खर्च करतात.
कृतीवर लक्ष केंद्रित करा, पूर्ततेवर नको
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, काही लोक दिवसभर अखंडपणे काम करूनही दिवसाच्या शेवटी त्यांचं खूपच कमी काम पूर्ण झालेलं असतं. याचं एकमेव कारण म्हणजे ते लोक कमी महत्त्वाच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात. ज्या कामांमुळे लक्षणीय परिणाम प्राप्त होणार असतो, अशा एक-दोन अतिशय महत्त्वाच्या कामांना ते पुढे पुढे ढकलत राहतात. त्यांनी ही कामं प्राधान्यानं पार पाडली, तर निश्चितच त्यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत कारकिर्दीमध्येही खूप मोठा फरक पडेल. तुम्ही हातात घेत असलेली एकमेव महत्त्वाची कामगिरी सर्वांत अवघड आणि किचकट असू शकते; पण ती पूर्ण केल्यामुळे मिळणारं यश हे नेत्रदीपक असेल यात शंका नाही.
यामुळेच अत्यंत महत्त्वाची वरच्या पातळीची २० टक्के कामं शिल्लक असताना तुम्ही त्याखालची तळातील ८० टक्के कामं कटाक्षानं दूर ठेवायलाच हवीत. कामाला सुरुवात करण्याआधी नेहमी स्वतःला विचारा, हे काम वरच्या २० टक्क्यांपैकी आहे की खालच्या ८० टक्क्यांपैकी?
Comments
Post a Comment