कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापनात काहीशा मागे असलेल्या महिलावर्गाने विमा खरेदी करण्यामध्ये मात्र पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालानुसार वैयक्तिक आरोग्यविमा खरेदी करण्यात महिलांनी पुरुषांवर आघाडी घेतली आहे. अहवालानुसार आरोग्यविमा खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७च्या ९ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०१९मध्ये १९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
२५ ते ४५ वयोगटात सर्वाधिक खरेदी
महिलांमध्ये सर्वाधिक आरोग्यविमा खरेदी करण्याचे प्रमाण २५ ते ४५ या वयोगटात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे करिअरला सुरुवात केल्यानंतर लगेचच आरोग्य विमा खरेदी करून आर्थिक नियोजन करण्यावर भर असल्याचेही 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उमेदीच्या वयात आरोग्यविमा घेऊन करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत असल्याचेही या अहवालातून दिसून आले आहे.
'सर्व वयोगटासाठी विमा महत्त्वाचा'
सर्व्हेक्षणातील आकडेवारीबाबत मत व्यक्त करताना 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या आरोग्य विमा विभागाचे प्रमुख अमित छाब्रा म्हणाले, 'आपल्या देशातील महिलांचे सरासरी आयुर्मान ६९ वर्षे आहे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच विमा संरक्षण घेणे हितावह असल्याचे महिलावर्गाला उमगले आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्य विमा महत्त्वाचा आहे. तरुण मुलींनी पालकांसह, नोकरदार आणि विवाहित ममहिलांनी वैयक्तिक आरोग्य विमा योजना खरेदी करण्याची गरज आहे.'
महिलांमध्ये हृदयाशी, रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार, मधुमेह, थायरॉइड, वंध्यत्व आणि स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याबरोबरच वैद्यकीय खर्चांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे महिलावर्गाने विमा काढणे अत्यावश्यक बनले आहे.
अमित छाब्रा, आरोग्य विमा प्रमुख, 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'
Comments
Post a Comment