फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही. आता आपण ह्या तिन्ही बाबी काय आहेत हे पाहुया.
अर्थव्यवस्थेचे विश्लेषण
दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अशीच वेळ चांगली असते ज्या वेळी बाजारात मंदी असते कारण याच वेळी साऱ्या शेअर्स चे बाजारमूल्य कमी झालेले असते व एका गुंतवणूकदारास ते कमी किमतीत मिळतात, मात्र हि स्थिती अल्पमुदतीच्या गुंतवणूकीसाठी जोखमीची आहे.
औद्योगीक जगताचे विश्लेषण
प्रत्येक औद्यगीक क्षेत्र हे ४ प्रकारच्या अवस्थेतून संक्रमण करत असते. १) सुरुवातीचा उभारणीचा कालखंड २) विस्तारिकरण व व्यवसाय वृध्दीचा कालखंड ३) स्थैर्याचा कालखंड ४) व्यवसायाच्या उतरीणीचा कालखंड जो गुंतवणूकदार त्या औद्योगीक क्षेत्राच्या सुरुवातीच्या उभारणीच्या कालखंडात त्या क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स घेतो त्याला सर्वाधीक फायदा मिळतो. जो विस्तारीकरण व वृध्दीच्या काळात गुंतवणूक करतो त्यालाही चांगला फायदा होतो. म्हणूनच जेव्हा स्थैर्याचा कालखंड सुरु होतो तेव्हा मिळणारा परतावा हा तुलनेने कमी होत असतो या साठी योग्यवेळी बाहेर पडून (शेअर्स विकून) फायदा मिळवणे फायदेशीर होते. औद्योगीक क्षेत्राला (सेक्टर) प्रतिकुल काळात उतरती कळा सुरु झाली कि त्या क्षेत्रातील कंपनीत गुंतवणूक करण्यात काहिच अर्थ नसतो. म्हणून ज्या क्षेत्रीय कंपनीत गुंतवणूक करावयाची असेल ते क्षेत्र सध्या कोणत्या स्थितीतून जात आहे हे पाहून मगच त्या क्षेत्रातील एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी कंपनीचे विवीध रेशो विश्लेषण करुन, विक्रीच्या उलाढालीतील बदल, नफा क्षमता इ. बाबींव्दारे तपासणी करुन मगच गुंतवणूक करावी.
कंपनीचे विश्लेषण
काही वेळा असे होते कि एखाद्या सेक्टरसाठी परिस्थिती अनुकूल असते तरीसुध्दा त्या सेक्टरमधील काही कंपन्याची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली नसते किंवा अगदी सुमारही असते. तसेच त्या क्षेत्रातील काही कंपन्या इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करत असतात. म्हणूनच गुंतवणूकीचा निर्णय करण्यापुर्वी कंपनीचे विश्लेषण करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील बाबी तपासून घ्याव्यात:
१) कंपनीचा इतिहास, मागिल काही वर्षातील कामगिरी व व्यवसायाचे स्वरुप. २) कंपनी करत असलेल्या उत्पादनांची बाजारातील मागणी नियमीत व वाढती आहे का ते तपासावे. ३) कंपनीचा बाजारातील हिस्सा (भांडवलाचा तसेच विक्रीचा). ४) व्यवस्थापन ५) कोणत्या उत्पादनांसाठी पेटंट / ट्रेडमार्क घेतलेले आहे ६) कोणत्या परदेशी संस्थेबरोबर भागिदारी आहे का? असल्यास तिची गरज काय व भविष्य कसे आहे? ७) बाजारातील सध्याचे व भविष्यातील स्पर्धक. ८) भविष्यातील व्यवसाच्या योजना. ९) भांडवलाच्या बाजार मुल्यानुसार कंपनी मोठी, मध्यम कि लहान गटात मोडते ते पहा. १०) मागील प्रकरणात सांगीतल्यानुसार रेशो विश्लेषण करावे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमचा निश्र्चित असा एक दृष्टीकोन असला पाहिजे. तुम्ही शेअरच्या किंमतीत होणा-या वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्ही ग्रोथ स्टॉक खरेदी करुन तुम्हाला अपेक्षीत फायदा झाल्यावर ते विकून दुसरे वृध्दी शेअर्स खरेदी केले पाहिजेत. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर नियमीत चांगले उत्पन्न मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही ज्या कंपन्या नियमीतपणे चांगल्या दराने लाभांश देतात अशा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तसेच भविष्यात चांगली कामगिरी करु शकणारे दुर्लक्षीत शेअर्सची शोधून त्यात गुंतवणूक करुणे हेही तुमचे उदिष्ठ असू शकते. या तिन्ही प्रकारांवर एक धावती नजर टाकूया.
वृध्दी शेअर्स
या प्रकारात अशा कंपन्याचे शेअर्स मोडतात कि ज्या कंपन्याची विक्री व निव्वळ नफा हा उत्तम प्रकारे सतत वाढत रहाण्याचा संभव असतो. या कंपन्याची वृध्दी लक्षणीय असून त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांपेक्षा यांची प्रगती वेगाने होत असते. या कंपन्या अत्यंत कमी किंवा अजिबात लाभांष न देता होणारा फायदा परत व्यवसायातच गुंतवणूक करणे योग्य मानतात. अशा प्रकारातील कंपन्या या प्रामुख्याने अनेक दशके/शतके त्या व्यवसायात असतात व सतत उत्तम व्यवस्थापनाव्दारे चांगली कामगिरी करत असतात. उदा. हिंदुस्थान युनीलिव्हर, नेसले, इन्फोसीस, विप्रो अशा अनेक चांगली कामगिरी वर्षानुवर्षे करणा-या कंपन्या या प्रकारात मोडतात.
व्हँल्यू स्टॉक
काहि कंपन्या गुंतवणूकदारांकडून दुर्लक्षीलेल्या असतात कि ज्यांच्यामध्ये भविष्यात उत्तम कामगिरी होऊ शकते. अशा कंपन्याचे शेअर्सचे बाजारमुल्य अनेक कारणांमुळे फार कमी असते मात्र त्यांच्या मालकीची भविष्यात वृध्दी होऊ शकेल अशी, इमारत, जमिन, मालाचा साठा, उपकंपन्या अशी मोलाची मालमत्ता असते. असे स्टॉक शोधताना कमी पी / ई रेशो असणारे, जास्त डिव्हीडंड यिल्ड असणारे शोधावे लागतात. टेंपलटन म्युच्युअल फंड असे स्टॉक शोधून त्यांच्या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलीओमध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रसिध्द आहे. भविष्यात वृध्दी व चांगला लाभांश मिळण्यासाठी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, मात्र असे शेअर्स कदाचीत जास्तकाळ तुम्हाला तुमच्या पोर्टफोलीओमध्ये सांभाळूण ठेवावे लागतील.
उत्पन्न देणारे शेअर्स
ज्या कंपन्या नियमीतपणे चांगला लाभांश देतात मात्र त्यांच्या शेअर्सचे बाजारमुल्य मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत नसते अशा कंपन्या काही गुंतवणूकदार नियमीत उत्पन्न मिळवण्यासाठी निवडत असतात. बाजारा मंदी असताना अशा कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जास्त चांगले होते कारण त्यांचे बाजारमुल्य कमी प्रमाणात खाली वर होते व त्यांचा त्या काळात चांगला डिव्हिडंड यिल्ड असतो.
छान माहिती मिळाली सर आपल्या द्वारा
ReplyDelete