आपल्या आर्थिक जीवन चक्रामध्ये अडचणी आणि संधी निर्माण होत असतात. यामध्ये आपण उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नातील काही रक्कम खर्च करतो आणि शिल्लक राहिलेली बचतीच्या स्वरूपात गुंतवणूक करीत असतो. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वय वर्ष 30 ते 40 खूप महत्त्वाचे असते. या वयामध्ये बहुतेक लोक त्यांच्या वैयक्तिक नियोजनाच्या गोड स्थळी पोचलेले असतात. कारण आपल्याकडे अधिकतर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वयाच्या 25 ते 35 या दरम्यान नोकरी लागते किंवा काही तर उद्योग धंदा सुरू केलेला असतो. सुरुवातीला इन्कम सुरू झाल्यानंतर आपण बचत न करता पैसा खर्च करीत असतो. अशा वेळी लोक बचत आणि गुंतवणुकीच्या योजने कडे दुर्लक्ष करतात. पैशाची गोष्ट अशी अवस्था आहे. जेथे चुका सुधारण्याची क्षमता कमी असते. कारण या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असतो. म्हणून आपले आर्थिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याची आणि चांगल्या भविष्यासाठी मार्ग तयार करण्याची ही वेळ आहे. आपण आयुष्यातील आर्थिक चुका लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्व भारतीय लोकांमध्ये अर्थसाक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा संकल्पना स्पष्ट नाहीत. आजही लोकांना सोने आणि स्थावर मालमत्ता हेच गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय आहेत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. असेट आणि लायबिलिटी यातला फरक कित्येक लोकांना माहीत नाही. कित्येक मध्यमवर्गीय लोकांनी घरामध्ये गुंतवणूक केले आहे. त्यांच्या मते घर ही गुंतवणूक आहे परंतु खरं तर ती एक लायबिलिटी आहे. आपली गुंतवणूक एकाच पोर्टफोलिओ मध्ये असते. उच्च उत्पन्न आणि बचत वाढीच्या टप्प्यामध्ये आपले इक्विटी चे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. परंतु अधिक तर लोक इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करीत नाहीत. सेवानिवृत्ती सारखी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी हाती असतो. इक्विटी सारख्या वाढीच्या मालमत्तेचा त्यांना फायदा घेताय येतो. त्याचबरोबर इक्विटी बाजारातील गुंतवणूक मुलांच्या शिक्षणासारख्या उद्दिष्टांसाठी देखील वापरता येते. आपण आर्थिक कमाईच्या सुरुवातीस इक्विटी बाजार जाणीवपूर्वक गुंतवणुकीसाठी निवडला पाहिजे. आज भारतातील फक्त चार टक्क्यापेक्षा कमी लोक इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. यापैकी अर्धा टक्के लोकांनाही इक्विटी मार्केटचे नॉलेज नाही. अलीकडेच प्रकाशित झालेल्या इकोनॉमिक्स टाइम्स मधील एका बातमीनुसार अधिकतर लोकांनी इक्विटी मार्केटचा स्वीकार हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून केल्याचे निदर्शनास आले आहे.
आपल्याकडे बरेच लोक रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. भारतामध्ये अधिकतर लोकांचा विश्वास आहे की आपल्या पोर्टफोलिओ मध्ये रिअल इस्टेट सेक्टर असायला हवे. परंतु जाणकारांचे म्हणणे असे आहे की रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास अकार्यक्षम आहे. अलीकडील एका संशोधनामध्ये ही बाब सिद्ध झाली आहे की, भारतामध्ये शहरी आणि निमशहरी भागातील 90 टक्के कुटुंबांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. जी गुंतवणूक त्या लोकांच्या 20 टक्के देखील गरजा पूर्ण करू शकत नाही. अलीकडे ग्रामीण व शहरी भागांमध्ये वय वर्ष 30 व त्यापुढील वयोगटात उच्च ग्राहक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. परतफेड ही बचतीवर घातलेली वेसन आहे. जी तुमची गुंतवणुकीची क्षमता नष्ट करते. त्यासाठी त्वरित कर्ज फेडण्यासाठी योजना तयार करा. आज युरोपियन देशातील 40 टक्के तरुण पिढी ही कर्जाच्या विळख्यात अडकले आहे हे लक्षात असू द्या. यास जबाबदार फक्त क्रेडिट कार्डची व्यवस्था आहे. जास्त तर लोक एक्स्ट्रा काम करीत आहेत ते म्हणजे क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी.
तुमच्या आर्थिक जीवन चक्रामध्ये आपण पुढील बाबी कधीही गृहीत घेणे आवश्यक आहे. सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण, मुलांचे करिअर, आणीबाणीचा खर्च, नोकरी गमावणे, उत्पन्नात खंड पडणे. या सर्व घटकांचा आपण विचार करून त्यासंदर्भात योग्य त्या तरतुदी करून ठेवणे कधीही आर्थिक क्षमतेसाठी लाभदायक असणार आहे. जीवनशैली आणि इतर खर्च कमी करून बचत वाढविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आर्थिक नियोजनामध्ये चूक केली जाते. ती म्हणजे आपत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष. उत्पन्नाच्या संरक्षणासाठी आपत्कालीन निधी, वैद्यकीय विमा आणि टर्म इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.
सध्या भारतातील पाच टक्क्यांपेक्षा कमी लोकांकडे इन्शुरन्स आहे. तो इन्शुरन्स पर्याप्त आहे की नाही हे आपणास अधिक माहित असेल. टर्म इन्शुरन्स भारतामध्ये अप्रिय आहे. मी स्वतः एस.बी.आय लाइफ इन्शुरन्स सोबत काम करतो. 200 ते 300 पॉलिसीच्या पाठीमागे एक किंवा दोन टर्म इन्शुरन्सला लोक स्वीकारतात. कमवत्या टप्प्यामध्ये अनपेक्षित घडणाऱ्या घटनांवर मात करण्यासाठी टर्म इन्शुरन्स असावा. किमान दहा वर्षानंतर टर्म इन्शुरन्स पुनर्मूल्यांकन करा. त्यानुसार टर्म इन्शुरन्स पर्याप्त आहे का याचे परीक्षण करावे व टर्म इन्शुरन्स वाढवून घेणे आवश्यक असते.
आर्थिक जीवन चक्रामध्ये पैशाचे योग्य नियोजन नाही केले तर आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे हे आपण जाणताच. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यातील अधिकतर शेतकरी कर्जबाजारी होते. आणि हे कर्ज कशासाठी काढले होते तर मुलीच्या लग्नासाठी. ही परिस्थिती का येते तर आर्थिक जीवन चक्रामध्ये आपण योग्य ते निर्णय घेतले नाहीत म्हणून. ऐन वेळी नातेवाईक, मित्र यांच्याकडे हात पसरावे लागतात हे लक्षात असू द्या.
पाठी मागील दहा वर्षांमध्ये आपल्या राहणीमानात जो बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवीन आजार उद्भवत आहेत. हार्ट अटॅक आणि प्यारलेस चे प्रमाण वेगाने वाढत आहे. या आजारावरती उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. अशा वेळेस आपण आयुष्याची एकत्रित केलेली बचत डॉक्टर च्या हवाली करतो. पण कधी आपण मेडिकल पॉलिसीचा विचार करणार नाही. मराठी माणूस आजही धार्मिक सण समारंभ यात्रा यावरती वर्षाला 15 ते 20 हजार रुपये खर्च करतो. मेडिकल पॉलिसी वरचा खर्च अनुत्पादक वाटतो हा खर्च त्याला उत्पादक वाटतो. उत्पादक गोष्टी दुसऱ्यांना दिसत नसतात. अनुत्पादक गोष्टी दुसऱ्यांना दिसतात हे लक्षात असू द्या.
मराठी तरुणांनो तुम्ही वेळेत सावध होणे आवश्यक आहे. अर्थसाक्षर व अर्थसक्षम व्हा. पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये प्रचंड बदल होणार आहेत. पाठी मागील 30 वर्षात तुम्ही जे बघितले अनुभवले ते पुढील पाच ते दहा वर्षांत कालबाह्य होणार आहे. चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऑटोमेशन आणि रोबोटिक्स याला खूप महत्त्व येणार आहे. पारंपरिक नोकरीतील सर्व क्षेत्रे पाच वर्षात संपणार आहेत. भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने पाठी मागील काही दिवसापूर्वी नवीन शैक्षणिक धोरण 2019 चा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की 2032 पर्यंत देशातील 30000 महाविद्यालय बंद करणार आहेत. जे काही महाविद्यालय किंवा शिक्षण पद्धती उपलब्ध असेल त्यामध्ये फक्त कौशल्य भिमुख शिक्षण सुरू झालेला असेल हे लक्षात असू द्या. आज आपण जे शिकत आहे ते 20 वर्षांपूर्वीच कालबाह्य झाले आहे.
आजची शिक्षण पद्धती तुम्हाला आर्थिक नियोजनाचे कोणतेही शिक्षण देत नाही हे लक्षात असू द्या. ज्या घरांमध्ये उद्योग-व्यवसाय आहे ज्या घरामध्ये व्यापार आहे त्या घरांमध्ये अर्थसाक्षरता खूप जास्त असल्याची दिसून येईल. त्या घरातील मुलांना माहित आहे असेट काय आहे आणि लायबिलिटी काय आहे. पुढील पाच ते दहा वर्षांत तुम्ही नोकरीला आहे का हे कोणीही तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही व्यवसाय काय करताय तुमच्याकडे काय कौशल्य आहेत हे फक्त विचारले जाईल. पैसा आणि कौशल्य या 2 जाती तयार होत आहेत. जगातील सर्व जगण्याचे नियम हे पैसे वाल्यांनी तयार केले आहेत हे लक्षात असू द्या.
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने मुक्त बाजारात अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. सरकारी सर्व उद्योग सरकार विकत आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा एक नियम आहे जो राबेल तोच जगेल. मित्रांनो श्रमाला खूप प्रतिष्ठा आहे. संपूर्ण जग वार्धक्याकडे झूकले आहे. भारत जगातील एकमेव देश आहे. ज्याच्याकडे सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे. पुढील तीस ते चाळीस वर्षे जगाला मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी ही भारतीय लोकांचे आहे. मग त्यासाठी कोणती कौशल्य असणे आवश्यक आहे हे आपण स्वतः निश्चित करावे. पैसा कमवण्याचा कोणताही एक मार्ग स्वीकारू नका. पैसे कमवण्याचे दहा मार्ग कधीही चांगले. तुम्ही अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनला नाहीतर तुम्हाला तुमची मुलं सुद्धा विचारणार नाहीत.
प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी
वित्त सल्लागार
म्युच्युअल फंड ॲडव्हायझर
सब ब्रोकर
8459775427
छान लेख आहे!
ReplyDelete