निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना म्हणजे अशी योजना जी आपल्या निवृत्तीनंतर खात्रीने उत्पन्न, निश्चित कालावधीसाठी देण्याची हमी देते. या योजनेत सहभागी होऊन आपण योजनेचे हप्ते भरले असता, जमा रकमेत दीर्घ काळात वाढ होते. ह्या रकमेचे व्यवस्थापन करून धारकास दरमहा उत्पन्न मिळते. सर्वसाधारणपणे या वेळी मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने या उत्पन्नातून अस्तित्वात असलेली जीवनशैली राखता येते. आपण कोणावरही अवलंबून नाही, या भावनेतून आत्मसन्मानात भर पडते. अशा प्रकारच्या योजना जीवन विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि सरकार यांच्याकडून राबवण्यात येतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सरकारी मान्यता असलेली सेवानिवृत्ती योजना असून १८ ते ६५ या वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांस या योजनेत ऐच्छीकरीत्या सहभागी होता येते, नंतर ऐच्छिकरित्या ७० वर्षापर्यंत ती चालू ठेवू शकता येते. तर १ जानेवारी २००४ नंतर रुजू झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (सैन्य विभाग सोडून) या योजनेत सक्तीने सहभागी व्हावे लागते. पेन्शन वरील खर्चात बेसुमार वाढ झाल्याने सरकारी कामगारांना पूर्वीच्या निश्चित हमी पेन्शनऐवजी सहभा...