पॅराडाईज पेपर्स
पनामा पेपर्स घोटाळ्यापाठोपाठ आता ‘पॅराडाइज पेपर्स’ घोटाळा उघडकीस आला आहे. याद्वारे करचोरी आणि काळ्या पैशांचे पांढ-यामध्ये होणारे रुपांतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. काही बोगस कंपन्या आणि फर्म जगभरातील श्रीमंतांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करत असल्याचे या घोटाळ्यातून उघड झाले आहे. या घोटाळ्यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडामधील अनेक बड्या नावांचा समावेश असून अभिनेते, राजकारणी आणि उद्योगपतींसह ७१४ भारतीयांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे. हा घोटाळा उघड करण्यासाठी १.३४ कोटी दस्तावेजांची छाननी करण्यात आली आहे.
जर्मनीच्या ‘जिटॉयचे सायटूंग’ या वर्तमानपत्राने हा घोटाळा उघड केला आहे. ९६ मीडिया ऑर्गनायझेशनच्या मदतीने इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आयसीआयजे) पॅरेडाइज पेपर्स नावाच्या दस्तावेजांची छाननी केली. हे एकूण १.३४ कोटी दस्तावेज आहेत. विशेष म्हणजे १८ महिन्यांपूर्वी ‘जिटॉयचे सायटूंग’नेच पनामा घोटाळा उघड केला होता.
पॅराडाइज पेपर्स घोटाळ्यात ७१४ भारतीयांची नावे आहेत. याशिवाय जगभरातील १८० देशांचाही या घोटाळ्यात समावेश आहे. या यादीत भारत १९ व्या क्रमांकावर असून या घोटाळ्यात भारतातील राजकारणी, अभिनेते आणि उद्योजकांचा समावेश आहे.
घोटाळ्याचा शोध घेणा-या या टीमने बर्म्युडाच्या ‘ली फर्म अॅपलबॉय’चे दस्तावेज मोठ्या प्रमाणावर तपासले. ही कंपनी ११९ वर्षे जुनी आहे. या कंपनीच्या देश-विदेशात अनेक सहयोगी कंपन्या आहेत. त्यात एका भारतीय कंपनीचाही समावेश आहे. त्याशिवाय भारतातील काही कार्पोरेटस कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांवर नेहमीच सीबीआय आणि ईडीची वक्रदृष्टी राहिलेली आहे, असेही संगण्यात आले आहे.
या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. बर्म्युडामधील एका कंपनीत अमिताभ बच्चन यांचे शेअर्स असल्याची माहितीही समोर आली आहे. राजकारणात येण्यापूर्वी जयंत सिन्हा यांची ओमिडय़ार नेटवर्क कंपनीत भागीदारी असल्याचे आढळून आले आहे. भाजप खासदार आर. के. सिन्हा यांची एसआयएस सिक्युरिटीज ही कंपनीही या घोटाळ्यात असल्याचे समोर आले आहे. या शिवाय पॅराडाइज पेपर्स घोटाळ्यात अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा आधीचा नवरा दिलशान याचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्योग मंत्री विल्बर रॉस आणि त्यांचे रशियाशी असलेले संबंध ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहेत. याशिवाय कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलन करणा-या व्यक्तीचे नावही या यादीत आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथची वैद्यकीय आणि ग्राहक कर्ज कंपन्यांमधील गुंतवणूकही या संपूर्ण तपासातून समोर आली आहे. यासोबतच ट्विटर आणि फेसबुकमधील रशियन कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या पडताळणीतही काळेबेरे असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आले आहे.
सध्या अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना १९९० मध्ये विल्बर रॉस यांनी दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवले होते. त्याचीच परतफेड ट्रम्प यांनी रॉस यांना उद्योग मंत्रालय देऊन केल्याचे बोलले जाते. रॉस यांची एका रशियन कंपनीत गुंतवणूक असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघड झाले आहे. या कंपनीत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा जावई आणि अमेरिककडून निबर्ंध घालण्यात आलेल्या दोघांची गुंतवणूक आहे. ट्रम्प यांच्या विजयात रशियाची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा असताना हे प्रकरण उघडकीस आल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या निकटवतीर्याचे नावही यामधून समोर आले आहे. ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलनाचे काम करणा-या व्यक्तीमुळे कॅनडाला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाल्याचे यातून उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ट्रुडो यांनी टॅक्स हेवन (कर नंदनवन) बंद करण्यासाठी अभियान राबवले आहे. मात्र आता त्यांच्याच जवळची व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने ट्रुडो यांची मोठी नाचक्की झाली आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचेही नाव या प्रकरणात समोर आले आहे. एलिझाबेथ यांनी जवळपास १ कोटी पाऊंड इतकी रक्कम परदेशात गुंतवली आहे. हा पैसा केमन आयलँड्स आणि बम्र्युडामध्ये गुंतवला गेल्याचे उघडकीस आले आहे. हा पैसा करचोरी करुन परदेशात गुंतवण्यात आला होता का, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र महाराणीने अशाप्रकारे परदेशात गुंतवणूक करावी का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याशिवाय गरिबांच्या शोषणाचा आरोप असलेल्या ब्राईटहाऊस या रिटेल समूहातही एलिझाबेथ यांची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.
Comments
Post a Comment