अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचे महत्त्व मोठे आहे. उद्योगांना भांडवल उभारणी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी व ती मोकळी करण्यासाठी शेअर बाजार सहाय्यभूत होतो. भारतात १८७५ मध्ये मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १९९० पर्यंत देशात साधारण २३ शेअर बाजार कार्यरत होते. ते प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होते. या सर्व बाजारातील एकूण व्यवहारांपैकी सुमारे ८० टक्के व्यवहार मुंबई बाजारात होत असत आणि तो देशात सर्वांत मोठा बाजार होता. त्याला अन्य बाजारांची फारशी स्पर्धा नव्हती. मोजके आणि एकमेकांशी खूपच जवळीक असलेले व्यापारी तेथे ब्रोकर्स म्हणून काम करत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद आणि मद्रास या शेअर बाजाराच्या नियामक मंडळात ब्रोकर्सची संख्या अनुक्रमे ६७, ७१, ६८, ६३ आणि ६० टक्के इतकी होती. यावरून बाजारात ब्रोकर्सचा प्रभाव सहज लक्षात येईल. कार्यकारी संचालकावर ब्रोकर्सचा खूप दबाव राहत असे. बाजाराच्या कारभारात पारदर्शकता नव्हती. तंत्रज्ञानाचा वापर नव्हता. खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजाराच्या हौद्यात ब्रोकर्सच्या आवाजी देवाणघेवाणीतून होत असत. काँट्रॅक्ट नोटवर व्यवहारांची वेळ नोंदलेली नसल...